महाराष्ट्रात हवामानुसार कलिंगड लागवडीसठी जानेवारी-फेब्रुवारी महिना सर्वात योग्य आहे. याचा परिणाम म्हणून फळे एप्रिल-मे महिन्यात बाजारात येतात आणि या फळांना भाव देखील चांगला मिळतो. भोगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रात खूप विविधता आहे. मध्य महाराष्ट्र जो की समुद्रसपारटीपासून उंचावर आहे, त्यामुळे या भागात हिवाळ्यात तापमान कमी होते. म्हणून अशा जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यात लागवड करणे योग्य ठरते. या भागात सामान्यपणे २० डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान लागवड करणे फायदेशीर ठरते. कलिडावर येणारी प्रमुख कीड म्हणजे लीफ मायनर, लाल भुंगेरे व फळमाशी तर रोग भुरी, केवडा व करपा दिसून येतात.

लिफ मायनर-या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सर्वच वेलवर्गीय भाजीपाल्यांवर आढळते. ही कीड पानांच्या आतमधील भाग खाते. त्यामुळे पानावर विचित्र नागमोडी वेडिवाकड्या पांढर्या रेषा तयार होतात. सामान्यपणे या किडीच्या प्रादुर्भावाला नांगी पडली असे देखील म्हणतात. याचा थेट परिणाम झाडाच्या कर्बग्रहण क्रियेवर होतो व फळांचे चांगल्या प्रकारे पोषण होत नाही. रोपे उगवल्यानंतर महिन्याभरातच ही कीड दिसून येते. उपाय-रोपे लागवड करताना लागण झालेल्या रोपांची कीडग्रस्त पाने काढून टाकावीत. लागवडीनंतर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसू लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास ५ मीलि. सायपरमेथ्रीनं १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
फळमाशी-ही माशी फळाच्या आतील गर खाते. मुख्यतःअळी नुकसान करते. परिणामी फळे सडतात किंवा अकाली गळून पडतात.

केवडा- दमट किंवा आर्द्रतायुक्त वातावरणात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. पिवळ्या रंगाचे ठिपके पानाच्या खालच्या बाजूला दिसतात. नंतर पानांचे देठ, बाळ्या किंवा फांद्यांवरही याचा प्रसार होतो.
उपाय-एम-45, 20 ते 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात किंवा बावीस्टीन 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
भुरी- पिठासारखी बुरशी पानाच्या खालच्या बाजूला दिसू लागते. कालांतराने पानाच्या प्रष्ठभागावरपण दिसते. त्यामुळे पाने पिठ शिंपडल्या सारखी दिसतात. हळूहळू पाने पिवळी होऊन गळून पडतात. हा रोग प्रामुख्याने बुरशीमुळे होतो. पावसाळ्यात याचा प्रादुर्भाव जास्त होतो.
उपाय- बावीस्टीन 10 ग्रॅम/बॅकलिक्सिन 5 ग्रॅम/ वॅकराथेन 10 मि.ली. पाण्यात मिसळून फवारावे आणि दर 15 दिवसांनी 2 ते 3 फवारण्या द्याव्यात. कोणत्याही प्रकारचे गंधक वापरू नये.

फळांची काढणी-पिकाचा कालावधी हा ९० ते १२० दिवसांचा असतो. त्यानंतर फळांची काढणी चालू होते. फळ काढणीसाठी तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी काही मापदंड आहेत व ते पुढीलप्रमाणे देठाजवळील बाळी पूर्ण सुकणे, फळ हाताने दाबले असता कर्रर आवाज येणे, फळांच्या जमिनीलगतचा भाग पांढरट पिवळसर होणे, फळांवर बोटाने वाजविले असता बदबद आवाज येणे व देठाजवळील लव नाहीशी होणे, ही सर्व लक्षणे फळ काढणीस योग्य आहे असे सांगतात.